जटाशंकरा. बोल रे...
देवा..
देवा जटाशंकरा..
तुला बोलायचं रे मला.. विचारायचंय तुला खुप काही.. बोल तु..
एवढा कठोर का झाला..??
तुला काय म्हणाव कळत नाही.. कठोर म्हणावं की मायाळु..??
भोळा तर आहेच तु.. भोळा शंकर म्हणून सगळ्या जगात तुझी ओळख आहे..!!
सांग ना काय खेळ सुरु केला आहे तु हा..
मागच्या ५-६ वर्षापासून बघायल गांव अण् तुझे भक्त.. महाशिवरात्रीच्या काळातच कोणाला तरी तु घेऊन जात आहे.. काहीतरी कोणीतरी पाहिजे तुला.. दरवर्षीच का..??
बस्स कर ना आता.!!
बोल काय पाहिजे तुला.. तुला तर माहित आहे आपलं गाव अन् गावकरी किती श्रीमंत आहेत.. पंचक्रोशीत प्रसिद्ध अण् सधन गाव आहे..
गावकरी तुझा शब्द खाली पडु देणार नाहीत.. तु फक्त बोल काय अण् किती पाहिजे..??
बघतो ना तु.. किती बागायतदार अण् मोठे लोकं आहेत गावात.. माहीत नाही का तुला.. लेकीवर किती प्रेम करतात.. लाड करतात.. गावचे सगळे जावई सुद्धा श्रीमंत, बागायतदार, नोकरदार, आणि उच्चशिक्षित अधिकारीच आहेत.. लग्नाच्या वेळेस.. कसा पैश्याचा.. खाण्या पिण्याचा पाऊस असतो कि तुझ्याच घरात.. तुझ घर लहाण पडु लागल तर दारात सुद्धा.. लेकिच्या सुखासाठी किती पुर आणतात माहीत नाही का हं..??
हो.!! हुंडाच म्हणायलो मी.. किती किती देतात माहित नाही का तुला. दानधर्म सुद्धा करतात कि.. तीन दिवस पंगती उठवतात कि.. आख्या गावाला अन्नदान करतात.. चुलबंद अवतान असते.. अस कस विसरतो..??
एवढ्या वरुन बघ विचार कर.. तुला फक्त आठवण करुन दिली.. विसरला असशील म्हणून.!!
सांग तुला काय पाहिजे.. किती पाहिजे.. बोल.!!
पण, हे खेळ बंद कर.. नाराजी दुर कर.. बोल काहीतरी..
काय तुझ नाटक.. आख्खा महाराष्ट्र दुष्काळाने जळायला.. करपायला.. भाजायला.. मरायला रे..
अरे दुसरीकड २५-२५ दिवस पाणी प्यायला नाही.. बघायला नाही.. माणसं मरायलेत.. कंटाळलेत सगळे.!!
आपल्या गावक-यांची पुण्यायी समजाव कि तुझा भोळेपणा.??
पुण्यायी म्हणाव तर.. का दरवर्षी तु अस वागत आहे..??
एकाला तरी नेतो.. दुर..
शांत करतो की शांति करतो समजत नाही तुझ..
असं तुझा वागणं बघुन..
लोकं म्हणायलेत तु चिडला आहे.. रुसला आहे. गावात लई पाप वाढलेत.. लई जणांकडुन ऐकायलो..
लोकं म्हणायलेत प्रत्येक गोष्टीत "राजकारण" वाढलय..
मला समजत नाही.. नेमकं हे राजकारण आहे तरी काय.. कळतच नाही!!
तुच सांग.. तु मोठा आहे.. तुझ्यात सगळी ताकद आहे..
"देवों का देव है तु.. महादेव है ."
तीन तीन डोळे आहेत तुला.. किती दिवस झोपेच सोंग करणार..?? तीन्ही डोळे बंद करुन झोपला वाटतय तु.. अन् जटातुन पाणी चालु ठेवलय.. म्हणून इथं तुझ्या अंगणात एवढ पाणी वाया चालय.. हो! जरा धार कमी झाली..
किती भोळा अण् आळशी तु.. ऊठ आता.. बोल काहीतरी.. सांग काय चुकायल..??
ये कोणाच्या तरी स्वप्नात ये.. शब्दात ये.. अण् एकदाच सांग.. माया दाखवत आहे कि राग..??
जटाशंकरा समजायल रे आम्हाला.. माहीत आहे.. चुकायलो आम्ही.. कळायल सुद्धा.!!
तुच विचार कर आमचा..
किती काम आहेत आम्हाला.. तुच क्रुपा करतो.. आशीर्वाद देतो.. काम वाढतात.. काय करावं कळत नाही.. मजा, मस्ती, माज, श्रीमंती, मोठेपणा, पुढारीपणा, दाखवत फिराव कि तुझ्याकड बघत बसाव..
आमच्याकड सगळ आहे काही कमी नाही.. मग का करु नाही माज..? सांग कुठ चुकायलो का.??
तुला काही गरज नाही.. तु मस्त गावाबाहेर आहे.. निवांत अण् सुस्त,
तुला काही तान नाही.. टेंशन नाही..
गावातल्या गोष्टी तुला काय सांगाव..??
आम्हाला किती अडचणी आहेत.. रोज एकमेकांची जिरवाव लागते आम्हाला.. निवडणुका असतात.. काटे काढाव लागतात.. माणसं फोडावी लागतात.. पैसे वाटाव लागतात.. पहारा द्यावा लागतो.. नेता नाही झालो तर कोणी विचारत नाही.. तुला माहिती नाही आम्हाला किती तरी फ्रेंड्स सर्कल, पक्ष, पार्ट्या संभाळाव लागतात.. WhatsApp अण् Facebook चे किती ग्रुप आहेत.. रोज फोटो अपलोड कराव लागतात.. शुभेच्छा द्याव्या लागतात.. काय सांगाव तुला.. हे नाही केल तर काय होईल ते.??
बैनर लावाव लागतात.. वाढदिवसं कराव लागतात दणक्यात.. यातुन वेळ काढून आम्ही शेती करतो.. शेतात गडी भेटत नाहीत, टिकत नाही.. त्यांना टिकवण्यासाठी.. काय काय कराव लागतं माहित आहे का तुला.??
तुच सांग हे सोडुन तुला वेळ देण सोप आहे का.?? तरी आम्ही तुझी जत्रा अण् श्रावण करत असतो..
यावर्षी बघीतलं नाही का जत्रा कशी झाली..??
महाशिवरात्रीच्या दिवशी तुझी रुम किती सजवली होती..??
अरे! किती फुगे अण् फुले लावली होती.. एकदम वाढदिवस वाली फिलींग येत होती.. मस्त झकपक केल होत ना.. भारी वाटु लागल.. दनादन सगळीकड WhatsApp, Facebook, Hike अण् सगळ्या सोशल मीडिया वर तुझ्या अण् सजावटीच्याच फोटो पडु लागल्या.. जिकड तिकड हवा अण् चर्चा फक्त तुझीच.. दिवस गाजवला तु.!!
बाहेरुन येणा-या तुझ्या भक्तगणांना काही कमी पडु नाही म्हणून फराळाची सुद्धा व्यवस्था केली होती जागरुक भक्तांनी.. एकदम फिल्टर्ड वाटर होत.. पाणी पाउच होते.. सगळे रस्ते, नाल्या भरुन वाहु लागले कि कैरीबैग, कागद, मेनकापडं.. रस्ता तर फुल टु पाऊचच्या अंथरनाचा वाटु लागला ना.. अजुन बी बघ.. सगळी गटारं अण् नाल्या पाऊच ने भरुन असतील.. कोणाला काही कमी पडु दिल नाही.!!
बैनर तर कसे कडक अण् नजर लागतील एवढे भारी होते.. प्रत्येकजण थांबुन ५-१० मिनीट तरी थांबुन डोळे भरुन बघु लागले.. हसु लागले.!!
हो..बैनर वर तुझी सुद्धा फोटो होती.. तुझी आपली एकच पोज.. म्हणून साहेबांच्या, भाऊंच्या बाजुला जरा लहाण होती फोटो तुझी.. तुझ्यानिमीत्ताने साहेब खुष..!!
काही कमी पडु दिल नाही जत्रत.. रात्रीचा बैंड कसा वाजु लागला आठव... बाया बी नाचु लागल्या तुझ्या वाढदिवसाला.. जत्रची शोभा वाढवायला..
बघ.. किती श्रीमंत गांव आहे आपल..
बोल तु काय पाहिजे.. अस नाराज नको होऊ.. किती पाहिजे बोल.. म्हनल ते देऊ आम्ही तुला.. फक्त सांग..
ये कोणाच्या तरी स्वप्नात.. दाखव काय चुकायल आमचं..
काय राजकारण.. राजकारण..
सांग समजुन आम्हाला.. नेमकं राजकारण असते तरी काय.?? कशासाठी कराव ते राजकारण..??
मोठेपणासाठी.. जिरवण्यासाठी.. नावासाठी.. प्रतिष्ठेसाठी कि काहीतरी करण्यासाठी..?? विकासासाठी.?? कामासाठी.??
सांग कशासाठी ते...
जटाशंकरा..
उठ अण् सांग ना एकदा..
राजकारण, जिरवा-जिरवी, मोठेपना जे काय करायचं ते कमानीच्या पलीकड करा.. गावाबाहेर करा.. इथ गावात आणू नका सांग एकदा..
बोल तुझ्या त्या भक्तांना.. मंदिरात येताना तु कोणत्या साहेबाचा आहे.?? पक्षाचा आहे..?? कोणाच्या घरचा आहे.?? कोणाचा आहे ते रहा..
मला त्याच्याहुन काही घेण देने नाही.. काय असशील ते तुझ्या घरी.. मंदिराच्या बाहेर..
मंदिर माझे आहे.. माझ्या जवळ येऊन जर त्या साहेबांच अण् नेत्याचा जप करायचा असेल तर.. खबरदार.!!
पक्षनिष्ठा, स्वामीनिष्ठा सगळ बाहेर...
सांग एकदा हे बोंबलुन.
जटाशंकरा..
लहाण पणीचे दिवस आठवायलेत रे.. काय होते ते दिवस.. तेव्हाची ती जत्रा..
आम्ही कुस्ती धरायचो, जिंको अथवा पडो.. मस्त पारले बिस्कीट अण् संत्र्या गोळ्या भेटायच्या.
शंकरपट व्हायचे किती मस्त माहौल असायचा..
पिचरचे थियेटर यायचे..
अजुन एक तुझ्या मंदिराला १५ दिवस आधीपासून रंगरंगोटी व्हायची.. लाइटिंग असायची.. ३-४ स्पिकर, साऊंडबाक्स असायचे.. अण् त्यातून तुझे गाणे वाजायचे दिवसभर.. महाराष्ट्राचे लोकनाट्य यायचे.. जत्रची खरी मजा होती तेव्हा.. किती गोष्टी होत्या तेव्हा.
सगळच बंद आता.!!
एवढा बदल कसा झाला समजत नाही..
का. ?? तुलाच ते आवडायच नाही..??
सांग काय चुकल का आमच...??
जरा गावाबद्दल विचारतो
सांग ना आम्हाला एकदा..
किती दिवस आम्ही गावभर पांढरे कपडे घालुन भीक मागणा-यांचे तोंड बघाव..??
किती दिवस आम्हाला उघड्यावर हागायला जाव लागणार..??
किती दिवस आमचे लेकर नाल्या, उकंड्यावर हागणार..
आम्ही मोठे झालो.. माणसं वाढले तरी.. गटार अण् नाल्यांची साईज तेवढीच का..
पैसा आला, गाड्या आल्या, खूप काही आलय आमच्याकड..
डोकं तर खूप तुफान आहे.. पण, बुद्धी नाही आली अजुन.
वाकाव कोणी..?? कोणात कोणाला बोलायची हिम्मत आहे..?? जस आहे तस चलु द्या कशाला.. घेन न देनं
जरी कोणी बोले अण् सांगितल तर त्याची काय औकात..?? सोड देवा..
किती दिवस आमच्या बाया सावधान विश्राम करणार..??
ये एकदा कोणाच्या तरी स्वप्नात अण् सांग काय पाहिजे तुला.. बोल फक्त तु.. अजुन किती दिवस..
अभिषेक किती अण् कश्यान करायचे ते पण सांग..
हो आम्ही तोंडात गुटखा, तंबाखु ठेवुन सुद्धा अभिषेक करत असतो.
तुझ्या सेवेसाठी आम्ही दारु ढोसुन स्वयंसेवक होत असतो.. किती गजाळ्या फिरवतो माहित नाही का.. तोंडाचा वास कसा असतो.. विचार जे दर्शनाच्या रांगेत उभे होते.. त्यांना.!!
काही कमीच पडु देत नाही आम्ही तरी तु सांग काय पाहिजे तुला... नाराज नको होऊ.. रुसु नको.. चिडु नको.. बोल काहीतरी.. काय पाहिजे सांग..
तु बोला नाही अण् स्वप्नात आला नाही तर माझ मत पक्क होईल.. तु फक्त दगड आहेस.. तुझ्यापेक्षा आमचे भाऊ, दादा, साहेब, नेते हेच खरे देव आहेत.. त्यांची चलती आहे.. तु मुक्का अण् दगड आहेस.. त्यांच्या एका इशा-यावर सगळ्या गोष्टी बदलतात.. तुझ्याच्याने काही होत नाही.. खोटा आहे तु.!!
खरी ती नशा.. दारुची .!!
खरा आशीर्वाद तो.. नेत्याचा, साहेबांचा.!!
आजकाल खरे देव तेच कि..
प्रसन्न करण्यासाठी कोणता उपवास लागत नाही, नवस लागत नाही, अभिषेक लागत नाही, प्रार्थना लागत नाही..!!
फक्त एक तुझ्या जत्रत त्यांच्या फोटोच बैनर अण् साहेब कि जय एवढच..
एवढ केल कि लगेच.. दारु भेटते, गाड्या भेटतात, पैसा भेटतो अजुन काय पाहिजे.
तरी एकदा लास्टच..
बोल काहीतरी.. काय पाहिजे सांग.. ये कोणाच्या तरी स्वप्नात.. दाखवून दे तुझ अस्तित्व..
जटाशंकरा.. उठ अण् ये स्वप्नात..!!
-----------------------------------------------------------------
दि : १० मार्च २०१६. (गुरुवार)
यात्रेच्या नंतर गावक-यांच मन.. खदखद.. चिंता.!!
patil serious topic ahe ekdam bhari lihila ekdam
ReplyDelete🙌🏼🙌🏼Adkine Saheb
ReplyDeleteBhari
ReplyDelete